कार्यक्रम दिनांक : नोव्हेंबर २२ - २५, २०१९

10 वे अॅग्रोव्हिजन : 23 ते 26 नोव्हेंबर 2018
(पत्रकार परिषद - 28 जुलै 2018)

 

ठिकाण - रेशीमबाग मैदान, नागपूर
प्रदर्शन कालावधी - 23 ते 26 नोव्हेंबर, दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7
कार्यशाळा - 24 ते 26 नोव्हेबर, तीन स्वतंत्र कक्षात

उदघाटक - ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
कार्यक्रमाचे अध्यक्ष - ना.श्री. नितीन गडकरी, मुख्य प्रवर्तक अॅग्रोव्हिजन आणि मा. केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतुक व महामार्ग, जहाज बांधणी, जलसंपदा व गंगा शुद्धीकरण, भारत सरकार

नागपूर - 10 व्या अॅग्रोव्हिजनविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना केंद्रीय मंत्री ना. श्री. नितिन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष व आयोजन सचिव श्री. रवी बोरटकर, श्री. रमेश मानकर व इतर मान्यवर
नागपूर : 10 व्या अॅग्रोव्हिजनविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना केंद्रीय मंत्री ना. श्री. नितिन गडकरी. सोबत खासदार कृपाल तुमाने, आमदार मल्लिकार्जून रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. निशा सावरकर, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनचे अध्यक्ष व आयोजन सचिव श्री. रवी बोरटकर, श्री. रमेश मानकर व इतर मान्यवर

विदर्भातील कृषी परिवर्तनाचे महत्वाचे माध्यम व शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असलेले मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन, 10 वे अॅग्रोव्हिजन येत्या 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान रेशीमबाग मैदानावर (नागपूर) आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक, माननीय केंद्रीय मंत्री ना.श्री. नितिनजी गडकरी यांच्या उपस्थितीत आणि माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, दि.23 नोव्हेंबर रोजी 10 व्या अॅग्रोव्हिजनचे उदघाटन होणार आहे.

शेतकऱ्यांना शिक्षित, प्रोत्साहित व सबल करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मा.ना.श्री. नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ वर्षांपूर्वी अॅग्रोव्हिजनच्या आयोजनास सुरवात झाली. अल्पावधीतच हे मध्य भारतातील सर्वोत मोठे प्रदर्शन बनले आहे. यंदा दशकपूर्ती यानिमित्त अधिक भव्य स्वरुपात 10 व्या अॅग्रोव्हिजनचे आयोजन होणार आहे. कृषी ज्ञान तंत्रज्ञान प्रशिक्षणाचे केंद्रस्थान ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालने, कृषीविषयक ताज्या विषयांवरील चर्चासत्रे, विदर्भाच्या शेतीला नवी दिशा देणाऱ्या परिषदांसोबतच भव्य पशुप्रदर्शन, अॅग्रीथॉन आणि बळीराजाच्या गौरवाचा अॅग्रोव्हिजन अवार्ड सोहळा ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये राहणार आहेत.

कार्यशाळा अॅग्रोव्हिजनचे प्रमुख आकर्षण असलेल्या कार्यशाळांमध्ये उत्पादन तंत्रज्ञान, शेतीपद्धती, जोडधंदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बाजार सुविधा आणि पायाभूत सुविधांविषयी भर देण्यात येणार आहे. प्रत्येकी दीड तासांच्या पंधराहून अधिक विषयांवर कार्यशाळा होतील. देशभरातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विदर्भातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांपासून प्रेरणा घेण्याची संधी यातून शेतकऱ्यांना मिळेल. विदर्भासाठी तसेच कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त अशा पाच विषयावर प्रत्येकी तीन तासांच्या सखोल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात दुग्धव्यवसाय, फुलशेती, हळद व आले लागवड, संत्रा प्रक्रिया, सेंद्रीय शेती, मत्स्यपालन (मत्स्यशेती व निर्यात संधी) आणि कुक्कुटपालन या विषयांचा समावेश आहे.

- एकदिवसीय परिषद
यंदा 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्ये विदर्भाच्या कृषी विकासाला चालना देण्यासाठी दुग्धव्यवसाय व बांबू लागवड, व्यापारी संधी आणि ऊस उत्पादन या विषयांवर एकदिवसीय परिषदा होणार आहेत. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्नाच्या शाश्वत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणात्मक बदलांचा पाया घालण्यासाठी परिषदांचे आयोजन होणार आहे. राज्यकर्ते, धोरणकर्ते, प्रगतशील शेतकरी, पशुपालक यांच्याबरोबरच शेती व प्रक्रिया क्षेत्राशी संबंधीत सर्वच जण यात सहभागी होणार आहेत.

- भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शन
मध्य भारतातील सर्वात मोठे आणि लौकिक असलेले अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन यंदा अधिक व्यापक स्वरुपात सादर होणार आहे. भारतातील शेतीविषयक उत्पादने करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग, विविध राज्ये व कृषी विद्यापीठे प्रदर्शनात आपले तंत्रज्ञान सादर करणार आहेत. सोबतच जगात कृषी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या विविध देशांतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन व सेवा विषयक संस्था, कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यामध्ये फवारणीची अत्याधुनिक उपकरणे, मजूर समस्येवर मात करण्यासाठीची महत्वपूर्ण यंत्रे, संत्रा व इतर फळपिकांसाठीची यंत्रे, काढणीपश्चात तंत्रज्ञान, स्वयंचलित यंत्रणांचा समावेश आहे. याशिवाय दुग्धव्यवसाय व इतर विविध शेतीपुरक व्यवसाय केंद्रीत स्वतंत्र दालने उभारण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.

- भव्य पशुप्रदर्शन
अॅग्रोव्हिजनमध्ये गेल्या वर्षी प्रथमच पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर यंदा 10 व्या अॅग्रोव्हिजनमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (माफसू) व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने अधिक भव्य स्वरुपात पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जातीवंत जनावरांच्या प्रदर्शनासोबतच या ठिकाणी पशुपालन, दुग्धव्यवसाय व इतर संलग्न विषयांवर मार्गदर्शनपर प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात पशुधन प्रदर्शित करणाऱ्या पशुपालकांना सहभाग प्रमाणपत्र व तीन उत्कृष्ट जनावरांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तज्ज्ञ निवड समितीमार्फत पुरस्कारार्थींची निवड करण्यात येईल. प्रदर्शनात आपले दर्जेदार पशुधन प्रदर्शित करण्यासाठी इच्छूक शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

- अॅग्रोव्हिजन कृषीमंथन
विदर्भातील विद्यार्थ्यांचा शेती व संलग्न क्षेत्रांकडे कल वाढावा, त्यांनी शेती संबंधित क्षेत्रात करिअर घडवून शेतकरी विकासाला हातभार लावावा यासाठी दशकपूर्तीच्या निमित्ताने अॅग्रोव्हिजन मार्फत यंदा विद्यार्थ्यांसाठी कृषीमंथन (अॅग्रीथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धा व इनोव्हेशन्स आणि स्टार्टअपची राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात मांडणी यांचा यात समावेश आहे. या स्पर्धेचे विषय, निकष, निवड पद्धत आदी बाबतची सविस्तर माहिती लवकरच अॅग्रोव्हिजनच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. इनोव्हेशन्स, स्टार्टअपची प्रदर्शनात मांडणी कृषी व बिगरकृषी (अभियांत्रिकी, आयआयटी इ.) विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी संशोधक, नवउद्योजक व्यक्तींना आपले शेती वा शेतकरी विषयक इनोव्हेशन्स व स्टार्टअप बिझनेस मॉडेल 10 अॅग्रोव्हिजनमधील राष्ट्रीय कृषी प्रदर्शानात मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. यापैकी उत्कृष्ट व उपयुक्त संशोधनाची राज्यपातळीवर निवड करुन त्यास व्यवसायिक रुपांतरणासाठी अग्रोव्हिजन फाउंडेशनमार्फत आर्थिक व तांत्रिक सहकार्य पुरविण्यात येईल.

- अॅग्रोव्हिजन अवार्ड - 2018
अॅग्रोव्हिजनच्या दशकपूर्ती निमित्ताने गेल्या दहा वर्षात विदर्भात शेती क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा अॅग्रोव्हिजन अवार्ड देवून सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप राहील. तज्ज्ञांच्या निवड समितीमार्फत पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात येईल. इच्छूकांनी आपले प्रस्ताव परिपूर्ण माहिती व ती खरी असल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रासह अॅग्रोव्हिजन फाऊंडेशनकडे पाठवावेत. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता – अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, 402, गोविंद अपार्टमेंट, पोस्ट ऑफिस मागे, शंकरनगर, नागपूर. इ. मेल – agrovisiontc@gmail.com

पुरस्कारांचे गट : 1) फलोत्पादन  2) कृषीपुरक व्यवसाय (मत्स्यपालन, मधमाशी पालन, शेळी-मेंढीपालन, रेशीम उत्पादन, कुक्कुटपालन)  3) यशस्वी कोरडवाहू शेती 4) दुग्धोत्पादन 5) जलसंधारण

- आयोजक संस्था
अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन, एमएम अॅक्टिव सायटेक कम्युनिकेशन्स, पूर्ती उद्योगसमुह, विदर्भ आर्थिक विकास परिषद (वेद) व महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अॅग्रोव्हिजनचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, गुजरात आदी राज्य शासन आणि केंद्र व राज्य सरकारचा कृषी, पशुसंवर्धन आदी शासकीय विभागही आयोजनात सहभागी असतात. कृषी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या, संस्था प्रदर्शनाच्या प्रायोजक आहेत.

10 व्या अॅग्रोव्हिजनच्या निमित्ताने आयोजित विविध उपक्रम, कार्यशाळा व प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून अॅग्रोव्हिजनचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव श्री. रवी बोरटकर, श्री. रमेश मानकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.आयोजक

माध्यम सहकार्य

© कॉपीराईट २०१७, MMactiv. सर्व हक्क अभादीत .

web counter

वेबसाइट डिझाइन आणि डेव्हलप बाय : SCI Knowledge Interlinks